उदापूर (पुणे) : ओतूर (ता. जुन्नर) येथील मोनिका चौकालगत असलेल्या लिंबानी ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरियल दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोडाऊनशेजारील शेतात उसाचे पाचट जाळण्यात आले होते. याच्या झळा लागून गोडाऊनला अचानक मोठी आग लागली. यात गोडाऊनमधील पाण्याच्या टाक्या, प्लास्टिक व फायबर पाइप, प्लंबिंग मटेरियल, बेसीन, प्लायवूड, टाईल्स, पॅकिंगचे गवत इत्यादी माल जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने गोडाऊनमधील मजूर जेवणाच्या सुटीमुळे बाहेर गेले असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग लागल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराने, महेश पठारे, दत्ता तळपाडे, सखाराम झुंबड, रोहित बोंबले यांच्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचून बघ्यांची झालेली गर्दी हटविण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्थांसह प्रयत्न केले. तसेच जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाने तातडीने येऊन आग आटोक्यात आणली. परिसरात आगीचे व धुराचे प्रचंड लोळ उठल्याचे लांबून दिसत होते व संपूर्ण परिसर धुराने व्यापल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात आला होता.