नागपुरात जाऊन घेतो बावनकुळेंचा सल्ला; अजित पवारांचा मिश्कील टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:19 PM2023-05-01T13:19:41+5:302023-05-01T13:21:16+5:30
चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते विरोधकांवर जबरी टीका करत आहेत.
पुणे/मुंबई - २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच, राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल, या विधानावरुन त्यांनी राष्ट्रवादीला टोलाही लगावला. " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावा हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते.", असं त्यांनी म्हटलं होतं. आता, या विधानावरुन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते विरोधकांवर जबरी टीका करत आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मातोश्रीतून बाहेर पडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. आता, राष्ट्रवादीने मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा होईल, यावरुन केलेल्या विधानावर बावनकुळे यांनी टीका केली होती. काम करावं लागतं, नुकतं पोस्टरबाजी करुन ते होता येत नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यावर, अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांना टोला लगावला. मी आता मुंबईला जातोय, पुन्हा नागपूरला कसं जाता येईल हे पाहतो आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतो. त्यांना विचारतो, नेमकं कसं काम करावं लागतं, कसं काम केल्यावर पक्ष आपल्याला तिकीट देतो, कसं काम नाही केलं तर तिकीट नाकारतो. आपल्यालाही नाकारतो, बायकोलाही नाकारतो... ही सगळी माहिती त्यांच्याकडून घेतो. असा मोलाचा सल्ला त्यांच्याकडून घेतो. जर माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला त्यांचा सल्ला पटला तर तशापद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, असेही अजित पवार यांनी मिश्कीलपणे म्हटले.