स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाविरुद्ध न्यायालयात जाणार : सात्यकी सावरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:49 PM2020-01-06T18:49:28+5:302020-01-06T18:54:45+5:30
काँग्रेसजनांना बुद्धी यावी
पुणे : ब्रिटिश आणि स्वकियांसोबत एकाच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढा दिला आहे. अंदमानमध्ये दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा मिळणार हे समजल्यानंतरदेखील सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, त्यांच्याविषयी अवमानकारक व हीन दर्जाचे लेखन केले जात आहे. हे दुर्देवी असून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यात सांगितले.
मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाचे लेखन केले आहे. याचा निषेध करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने स्वातंत्र्यशाहीर सावरकर व अन्य शाहिरांच्या पोवाडे गायनातून सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रभक्तीचा शाहिरी जागर करण्यात आला. या वेळी स्वा. सावरकरांविषयाचे अभ्यासक अक्षय जोग, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शुभांगी आफळे, मोहन शेटे, अरुणकुमार बाभुळगावकर, महादेव जाधव, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
सात्यकी सावरकर म्हणाले, भारतातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांनी सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी या अवमानाचा निषेध करायला हवी. अक्षय जोग म्हणाले, सावरकरांनी समाजप्रबोधनासाठी शाहिरी, काव्य, पोवाडा असे अनेक प्रकार हाताळले. मातृभूमी स्वतंत्र व्हावी, याकरिता शाहिरी काव्यांचे लेखन केले. मात्र, अशा स्वातंत्र्यवीराचा स्वकियांनी अपमान करावा हे दुर्देवी आहे. सावरकरांचे विचार देशभर नव्हे तर, जगभर पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.
हेमंतराजे मावळे म्हणाले, काँग्रेसजनांना बुद्धी यावी, यासाठी हा शाहिरी कार्यक्रम करण्यात आला. सावरकर यांनी लिहिलेले पोवाडे आणि काव्यातून ते आजही आमच्यामध्ये आहेत. प्रत्येकाने सावरकरांच्या अवमानाचा निषेध करायला हवा.