पुणे : महाराष्ट्रात भौगोलिक, स्थानिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच उच्चार, आचार, जडणघडण, हवापाणी, उत्पन्न, राहणीमान, संस्कार यामध्ये वैविध्य आढळते. हे वैविध्य जाणून घेतानाच सांस्कृतिक ऐक्य जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या नकाशाचा अभ्यास आवश्यक आहे. नकाशा जाणून घेणे, त्यातील बदल नोंदवणे, अभ्यासणे, विविध नकाशांद्वारे महाराष्ट्राची ओळख करून घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हाच बदल अधोरेखित करणारा ‘नकाशा-दर्शन महाराष्ट्र ते जग’ हा संदर्भग्रंथ मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी अभ्यासक, विद्यार्थ्यांसमोर आणला आहे. सीडीरूपातील पुस्तकामुळे संगणकावर महाराष्ट्राचे समग्र दर्शन शक्य झाले आहे.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक तसेच सामान्यांना नकाशाचे महत्त्व जाणून घेता यावे, त्यातील ठळक बदल कळावेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात आला आहे. नकाशाच्या आधारावर महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, अभयारण्ये, धरणे, किल्ले, कारखाने, डोंगर, नद्या, गावे, शहरे, रस्ते, रेल्वे यांचा विभागवार अभ्यास मोजक्याच अभ्यासकांकडून केला जातो. शालेय पाठ्यपुस्तके वगळता अन्यत्र नकाशांचा अभ्यास, वापर, निरीक्षण, निष्कर्ष, अनुमान फारशी अभ्यासली जात नाहीत, अशी खंत सुरेश गरसोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.संदर्भग्रंथाच्या माध्यमातून थोरा-मोठ्यांची चरित्रे, कर्तृत्व, शोध, प्रगती जाणून घेण्यासाठी, अद्ययावत संदर्भासाठी, हजारो नकाशांमधून निवडक रंगीत नकाशे, सुस्पष्ट, वाचनीय स्वरुपात एकत्रित करण्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून सुरू होते. यातूनच संदर्भग्रंथ साकारला गेला. महाराष्ट्राच्या विविध नकाशांच्या वाचनातून, अभ्यासातून, निरीक्षणातून लेखी मजकुरापेक्षा, पुस्तकांपेक्षा बरीच जास्त माहिती मिळते. महाराष्ट्राच्या विविध विभागांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना, बदल, समतोल आणि समग्र स्वरुप, राज्याची प्रगती, ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रशासन आदींचा अभ्यास नकाशाच्या माध्यमातून करता येत असल्याचे जाणकारांनी सांगितले.आजचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी जन्मला. त्या वेळी राज्यात २६ जिल्हे होते. ५८ वर्षांमध्ये जिल्ह्यांची संख्या ३६वर पोहोचली आहे. या काळात पाच-सात वेळा नवीन जिल्हे, नवीन तालुक्यांची निर्मिती, प्रशासकीय पुनर्रचना झाली. हे बदल टिपत नकाशात बदल करण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक वर्षी महाराष्ट्राचा नकाशा दाखल व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नकाशामधून जाणा महाराष्ट्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 4:52 AM