पुणे : गणेशोत्सवाची संपूर्ण राज्यात धामधूम सुरू आहे. त्याचवेळी दक्षिण भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील पाच दिवस दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे उर्वरित दिवस व विसर्जनाच्या दिवशी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पुणे शहरात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. गेले दोन दिवस दुपारनंतर पावसाची जोरदार सरी येत होत्या. त्यामुळे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची पंचाईत होत होती. पाऊस आल्यास आडोशाला उभे राहण्यासाठीही जागा मिळत नव्हती. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाविकांचा महापूर रस्त्यावर दिसू लागला आहे. गौरीच्या विसर्जनानंतर लोकांची गर्दी देखावे पाहण्यासाठी वाढत असते. नेमकी पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी, मंगळवारी व बुधवारी आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसाच्या १-२ जोरदार सरी येऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. मात्र, शुक्रवारीही पावसाच्या काही जोरदार सरी येऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.