भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळजवळील चोंडीच्या धबधब्यावर बांधलेल्या झुलत्या पुलावरून मंचर येथील वैभव ऊर्फ दीपक शंकर खानदेशी (वय २३) हा युवक दि. २५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पडला असून, त्याचा अजूनही तपास लागलेला नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून पाऊस, धुके व धबधब्याला असलेल्या पाण्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. दि. २७ रोजी एनडीआरएफच्या टीमला या शोधमोहिमेसाठी पाचारण केले जाणार आहे.दीपक खानदेशी व त्याचे मित्र किरण बाळासाहेब खानदेशी, अक्षय बाबाजी बढे, चेतन दशरथ बढे, सचिन सुदाम इंदोरे, विजय दत्तात्रय मिंढे, स्वप्निल मोरे हे सर्व मंचर एस कॉर्नर येथील असून, दि. २५ रोजी ते भीमाशंकरमध्ये दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर कोंढवळकडे ते फिरायला गेले. चोंडीच्या धबधब्याजवळ वन्यजीव विभागाने पत्र्याचे शेड, प्रेक्षक गॅलरी व झुलता पूल केलेला आहे. येथे येऊन पर्यटकांनी ट्रेकिंग, राफ्टिंग करावे यासाठी त्याची उभारणी करण्यात आली आहे. याच वर्षी हे काम पूर्ण झाले व पहिल्याच पावसाळ्यात या झुलत्या पुलावर ही दुर्घटना घडली.एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी लोखंडी तारांच्या साह्याने हा झुलता पूल बनविला आहे. या झुलत्या पुलावरून दीपक पलीकडे गेला व पुन्हा येत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. हा धबधबा तीन टप्प्यांत खाली कोसळतो. दुसऱ्या टप्प्यात तो पडला व पाण्याला वेग असल्यामुळे खाली खोल दरीत गेला. सतत पडत असलेल्या पाण्यामुळे येथे खोल कुंड तयार झाले आहे तसेच आजूबाजूला कपारी तयार झाल्या आहेत. धबधब्याचे पाणी पुढे डिंभे धरणात जाते. या पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुमारे दोन किलोमीटर लांबपर्यंत शोध घेण्यात आला; मात्र तपास लागला नाही. ओढ्याचे पात्र पुढे उथळ व दगडगोट्यांचे असल्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही. धबधब्याजवळच तयार झालेल्या कुंडामध्ये अडकल्याचा दाट संशय असून, त्याप्रमाणेच पाण्यात शोध घेण्याचे काम सुरू आहे. दि. २५ पासून दीपकची मित्रमंडळी व काही स्थानिक ग्रामस्थ शोध घेण्याचे काम करीत आहेत. मात्र, पाऊस, धुके व धबधब्याच्या पाण्यामुळे तपास लागणे अवघड झाले आहे. दि. २६ रोजी रात्री उशिरापर्यंत काहीही तपास लागलेला नव्हता.घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल म्हणजेच एनडीआरएफच्या टीमशी संपर्क साधला असून, घटना घडल्यानंतर २४ ते ३६ तासांनंतर आमची टीम येईल, असे त्यांनी सांगितले आहे. दि. २७ रोजी एनडीआरएफची टीम येथे येणार आहे. (वार्ताहर)
धबधब्यावर जाताय, पर्यटकांनो सावधान!
By admin | Published: June 27, 2015 3:38 AM