ग्रामपंचायतीने दुकान केले सील
उंडवडी कडेपठार: गोजुबावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानादेखील अनेक लोक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत होते. तर पारावर गप्पादेखील रंगत होत्या. त्याबाबत दैनिक लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तहसीलदारांनी गावाला भेट देत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी ग्रामपंचायतीने कारवाईस सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीने एक दुकान सील केले आहे.
गोजुबावी गावात कोरोनाबाधित रुग्ण इतर ग्रामस्थांचा विचार न करता विनामास्क कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते. त्याचबरोबर इतर ग्रामस्थदेखील विनाकारण गावात फिरत असल्यामुळे गावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढ होत होते. विनाकारण फिरणाऱ्यांमुळे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे ग्रामपंचायत प्रशासन पुरते हैराण झाले होते. कारवाईसाठी पोलिसांनादेखील सांगण्यात आहे. मात्र, त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात होते. यासंदर्भात, दि. ११ रोजी दैनिक लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तहसीलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहुल काळभोर पंचायत समितीचे सभापती,उपसभापती,संभाजी होळकर यांनी गोजुबावी येथे भेट दिली. त्यानंतर गावात लसीकरणाला सुरुवात केली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला होता.
शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीने कारवाई सुरुवात केली. यावेळी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका किराणा दुकानावर कारवाई करत सात दिवसांसाठी सील करण्यात आले. यावेळी सरपंच माधुरी कदम,ग्रामसेवक सतीश बोरावके,उपसरपंच दुगार्दास भोसले, सदस्य किशोर जाधव सदस्या हिराबाई जाधव, पोलीस पाटील नितिन गटकळ आदी उपस्थित होते.
१५ उंडवडी कडेपठार