बारामती : गोजुबावी-सावंतवाडी (ता. बारामती) येथे आज पानी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत सामूहिक श्रमदानातून जवळपास १५०० घनमीटर समतल चर व बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली. या कामामुळे ३ हजार घनमीटर पाणीसाठा होण्याचा अंदाज आहे. आज झालेल्या महाश्रमदानाच्या कामामुळे परिसरातील शिवारे पाणीदार होण्यास मदत होणार आहे.बारामती तालुक्यातील ३३ गावांनी यंदा ‘पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर’ स्पर्धेत भाग घेतला आहे. वढाणे, सुपा, काळखैलेवाडी, बºहाणपूर, नेपतवळण, भिलारवाडी, पळशीवाडी, मासाळवाडी, दंडवाडी, आंबी बुद्रुक, काºहाटी, खराडेवाडी, निंबोडी, उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, कटफळ, मुर्टी, कºहावागज, वाकी, सोरटेवाडी, कन्हेरी, सावंतवाडी, गोजुबावी, पानसरेवाडी, लोणी भापकर, जळगाव सुपे, पारवडी, अंजनगाव, गाडीखेल, कांबळेश्वर, शिरवली, सदोबाचीवाडी या गावांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार गोजुबावी - सावंतवाडीच्या उजाड माळरानावर महाश्रमदान करण्यात आले. सकाळी सात वाजता सुरू झालेले हे महाश्रमदान ११ वाजेपर्यंत सुरू होते. त्यासाठी फावडे, टिकाव, घमेले घेऊन अनेकजण पोहोचले. बारामती हायटेक टेक्सस्टाइल्स पार्कचे कर्मचारी, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच एन्हॉयर्न्मेंटल फोरम आॅफ इंडिया या संस्थेचे स्वयंसेवक, पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे कर्मचारी, तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला. राजकीय पदाधिकारीही यामध्ये मागे नव्हते. महाश्रमदानात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, गावच्या सरपंच प्रमिला आटोळे, उपसरपंच रमेश आटोळे ,टेक्सस्टाईल्स पार्क अध्यक्षा सुनेत्रा पवार, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, भरत खैरे, राष्ट्रवादी कॉंगेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे आदींचा समावेश होता.बारामती तालुक्यातील गोजुबावी - सावंतवाडीच्या माळरानावर महाश्रमदान उपक्रम राबवून सलग समतल चर, बांधबंधिस्तीची कामे केली.>त्यांच्या सामाजिक संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधलेमहाश्रमदान करण्यासाठी चिमुकले विद्यार्थीदेखील मागे नव्हते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सामाजिक संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, पर्यावरणासाठी झाडे लावा, घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा आदी सामाजिक संदेश फलक उंचावून दिले. हे संदेश उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.>...‘एकीचे बळ मिळते फळ ’‘एकीचे बळ मिळते फळ ’ या म्हणीचा प्रत्यय आज येथील ग्रामस्थांनी घेतला.अवर्षणग्रस्त अशी या परिसराची ओळख आहे. गावाची अवर्षणग्रस्तही ओळख पुसून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्रित घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.आज केलेल्या श्रमदानाचे फलीत येत्या काही महिन्यांतच गावाला मिळणार आहे.
गोजुबावी-सावंतवाडीची शिवारे पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 1:22 AM