आशा काळे, अभिनेत्री
एका नाटकामध्ये माझ्यासमोरील नायकाने त्याच्या संवादात मोठा पॉज घेतला होता. तो खूप वेळ असल्याने मला वाटलं बहुधा तो संवाद विसरला असेल म्हणून मी माझा पुढचा संवाद म्हणून टाकला. त्यानंतर त्या अभिनेत्याने मला विचारलं, ‘मी पॉज घेतला होता. तू लगेच का तुझा पुढचा संवाद म्हटलास?’ त्यावर मी चटकन म्हटलं, ‘अच्छा तू ‘विक्रम गोखले पॉज’ घेण्याचा प्रयत्न करत होतास तर!’ ही गोष्ट कळली तेव्हा विक्रम म्हणाला, ‘बेबी, तू माझी चेष्टा करतेस का गं...’ मी म्हटलं, ‘मी कायं केलं?’ तो म्हणाला, ‘‘विक्रम गोखले पॉज’ हे काय नवं...’ मी म्हणाले, ‘आहेच की मग तुझा पॉज असा युनिक. तुझा संवाद जितका जबरदस्त असतो आणि त्यामध्ये तू घेतलेला पॉज हा तर त्याहून जास्त बोलका होतो. खरं सांगू विक्रम, कोणत्याही गोष्टीची कॉपी होऊ शकते, पण तुझ्या त्या पॉजची कॉपी होऊ शकत नाही. कारण तो ‘विक्रम गोखले पॉज’ आहे. त्याची कुणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याची माती होते.’ ...पण आज विक्रमने घेतलेला आयुष्यातील असा पॉज आहे की, त्यानंतर तो बोलणारच नाही; आणि ही गोष्ट अतिशय असहनीय आहे.२३ नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. त्याचदिवशी मला विक्रम अत्यवस्थ असल्याची बातमी कळली आणि मी प्रचंड अस्वस्थ झाले. कोल्हापुरात असल्यानं आई अंबाबाई मंदिरात गेले आणि प्रार्थना केली. माझा वाढदिवस अजिबात साजरा केला नाही. गोडधोड वर्ज्य केलं. माझा मोठा भाऊ अनिल काळे आणि विक्रम हे दोघे कॉलेजमध्ये बॅॅचमेट होते. अनिलबरोबरच तो घरी आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी विक्रम शिकत होता. मी तर शाळेतच होते. बाबांची बदली कोल्हापूरला झाली आणि मी आई-बाबांबरोबर कोल्हापूरला गेले. तिथे माझं नाटकातलं करिअर सुरू झालं आणि विक्रमचंही पुण्यात सुरू झालं. विक्रमचे वडील चंद्रकात गोखले आणि काका लालजी गोखले यांचा मोठा वारसा त्याच्याकडे होता. त्यामुळं त्याची थेट व्यावसायिक रंगभूमीवरच एन्ट्री झाली. माझं-त्याचं एकत्रित पहिलं नाटकं म्हणजे ‘मी वाहतो दुर्वांची जोडी’. त्या नाटकाचे आम्ही शेकडो प्रयोग केले. त्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकानं तर रसिकांनी आम्हाला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याचे नऊशेहून अधिक प्रयोग आम्ही केले. मला बेबी म्हणणारा कोणीच नाही याचं मोठं दु:ख
आई-वडील आणि अनिल मला बेबी म्हणायचे. विक्रमही मला बेबीच म्हणायचा. काही दिवसांपूर्वी भाऊ गेला, त्यानंतर आई-वडील गेले. काही दिवसांपूर्वी पतीही गेले. त्यावेळी बेबी म्हणून मला हाक मारत धीर देणारा फक्त विक्रम होता. आता विक्रमही नाही. हे दु:ख मोठं आहे. (शब्दांकन : दीपक होमकर)