इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, सचिव, नामवंत कापड व्यापारी, शहा ब्रदर्स अँड कंपनीचे सर्वेसर्वा गोकुळदास विठ्ठलदास शहा यांचे अल्पशा आजाराने आज (दि.१०) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रहात्या घरी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरणादी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद शहा यांचे ते वडील होते. गोकुळदास शहा यांच्या पत्नी शकुंतला यांचे गेल्या ३ ऑगस्टला निधन झाले होते.
सन १९३६ मध्ये जन्म झालेले गोकुळदास शहा सार्वजनिक जीवनात भाई या नावाने ओळखले जात. ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील यांना ते गुरुस्थानी मानत असत. त्यांचे जवळचे सहकारी म्हणून काम करत असताना, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कामे केली. आत्ताच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कारखान्याच्या उभारणीनंतर त्यांनी सलग ३३ वर्षापेक्षा जास्त काळ कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
सन १९६६ ते १९६९ या कालावधीत ते इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला होता. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सन २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.