प्रदीप पाटील ल्ल पौडभोगोलिकदृष्ट्या पुणे शहराला सर्वांत जवळचा व नैसर्गिक साधनांची विपुलता असलेला भाग म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे अलीकडील काळात या भागाचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. विविध प्रकारचे उद्योजक या ठिकाणी आपले लहान-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू करीत आहेत. त्यामुळे कामगारवर्गाच्या हाती पैसा येऊ लागल्याने व घरांना मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे गृहप्रकल्प उभारण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल वाढताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणून एकेकाळी छोटीशी खेडी असलेली तालुक्यातील जांभे, नेरे, हिंजवडी, माण, सूस, बावधन, पिरंगुट, भूगाव, भूकुम, घोटावडे, पिरंगुट, पौड व उरावडे ही गावे आता नव्याने शहर म्हणून उदयास येत आहेत. या ठिकाणी होत असलेल्या भौतिक बदलाच्या व वाढत्या नागरिकरणाच्या बदल्यात येथील ग्रामपंचायतीची साहजिकच आर्थिक आवक वाढण्यास मदत झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी लागणारे गावकारभारी म्हणजे सरपंच-उपसरपंच या पदासाठी फारशी स्पर्धा नसल्याने बिनविरोध निवडून दिले जायचे. परंतु, अलीकडील काळात ग्रामपंचायतीला व त्यातील पदाला सर्वार्थाने आलेले महत्त्व यामुळे यातील निवडणुका विधानसभेच्या निवडणुकापेक्षा अधिक खर्चिक व चर्चेच्या होत आहेत. पिरंगुट, हिंजवडी, माण, सूस, भूगाव, महाळुंगे येथील ग्रामपंचायतींचे सदस्यत्व मिळविण्यासाठी कोटींची उलाढाल होताना दिसते.पुणे शहराला जोडून नव्याने होणारा संकल्पित रिंगरोड याच गावांच्या पट्ट्यातून जाणारा असल्याने येथील जमिनीलाही सोन्याची झळाळी आली आहे. नवीन बांधकाम परवान्याचे ग्रामपंचायतीकडचे अधिकार सरकारने काढून घेतलेले असले, तरी झालेल्या बांधकामाच्या नोंदीतून, तसेच उद्योग-व्यवसायांना द्यावयाच्या ना-हरकत दाखल्याच्या शुल्कातूनही ग्रामपंचायतीना चांगली कमाई होताना दिसते. ४राज्य सरकारने नवीन बांधकाम परवाने ग्रामपंचायतीला देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने अधिकच महत्त्व ग्रामपंचायतींना मिळणार, हे नक्की आहे. मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग गावाच्या विकासाकरिता कसा करता येईल, याचे भान व नियोजन सर्वच ग्रामपंचायतीकडे नसले, तरी काही ग्रामपंचायतींनी मात्र त्या दिशेने पावले उचलल्याचे लक्षात येत आहे. आय. एस. ओ. मानांकन मिळवण्याचा तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा माण, माणगाव ग्रामपंचायतीने मिळवला. त्यापाठोपाठ नागरिकांना लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माण व पिरंगुट यांसारख्या ग्रामपंचायती करताना दिसत आहेत. ४अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायत व ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारती उभारण्याचेही काम पूर्ण केलेले आहे. गावाच्या सेवेसाठी लागणारा पुरेसा कामगारवर्गही बहुतांशी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहे. कासारआंबोली, माण, पौड या ग्रामपंचायतींच्या सुसज्ज इमारती पाहिल्या, की येथील ग्रामपंचायतीची संपन्नता सहजपणे आपल्या ध्यानात येते. रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, वाहतूककोंडी या शहरातील समस्या याही ग्रामपंचायतीची डोकेदुखी बनताना दिसत असल्या व नागरीसुविधांचा अभाव या सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नकारात्मक बाबी असल्या, तरी या समस्या सोडविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या पाठीशी ग्रामस्थांनीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.