लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाच्या बॅगमधून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे ३ किलो ३१९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी व्यावसायिकाने दोन महिला व एका लहान मुलावर संशय व्यक्त केला आहे.
याबाबत जिगेश नरेशकुमार बोराणा (वय ३३, रा. घाटकोपर, पश्चिम, मुंबई) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बोराणा हे त्यांचे मित्र मुकेश चौधरी यांच्यासह दागिने घेऊन पुण्यात आले होते. ते शहरातील विविध ज्वेलर्सना दागिने पुरवितात. त्यांच्याकडे ६ प्लास्टिक बॉक्समध्ये ६ किलो ९९ ग्रॅम वजनाचे दागिने होते. पिंपरीतून
रविवार पेठेतील राजमल माणिकचंद ज्वेलर्स येथे ते दागिने दाखविण्यासाठी आले होते. दुकानातील आतील रूममध्ये त्यांनी मुकेश कुंवर या सेल्समनला सोन्याचा माल दाखविला. त्यातील एका मंगळसूत्राचे डिझाइन पसंत करून त्यांनी कश काउंटरवर ऑर्डर देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कॅश काउंटरजवळ येऊन दुकानाचे मालक पन्हालाल छाजेड यांना मंगळसूत्र दाखविण्यासाठी बोराणा यांनी त्यांच्याकडील सॅकमधून फक्त मंगळसूत्र काढून दाखविले. त्यानंतर त्यांनी ते मंगळसूत्र पुन्हा सॅकमध्ये ठेवले. ते छाजेड यांच्याशी बोलत असताना त्यांच्या शेजारी एक महिला येऊन थांबली होती. तिच्यामागे दुसरी महिला व एक लहान मुलगा होता. शेजारी उभ्या असलेल्या महिलेने तोंडाला बांधलेला स्कॉर्फ सॅकवर टाकला. स्कॉर्फ घेताना तिने वरच्या बाजूला ठेवलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यावर बोराणा यांनी बाहेर येऊन त्या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या गर्दीत दिसेनाशा झाल्या.
त्या बॉक्समध्ये १ कोटी २० लाख रुपयांचे ३ किलो ३१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.