पुणे : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने सुवर्ण पदकावर स्वतःच नाव कोरून भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. भारतात सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता नीरजला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रात त्यांचा सत्कार केला जाईल, अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित होते. तेव्हा ही घोषणा केली.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वत:सह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्नपूर्तीनंतर आता नीरज चोप्राचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहोत. तसेच त्याला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण देऊनही सत्कार केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार
आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाजाला शिस्त आणि संयम पाळावी लागेल. सरकार चुकत असेल तर बोलावे लागेल, बरोबर असेल तर कौतुक करावे लागेल. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे लागेल. मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याची भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली. तसेच नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्येही मूक आंदोलन करणार आणि लवकरच तारीख जाहीर करू अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
नांदेडला पहिलं मूक आंदोलन असेल, तयारी सुरू करा...
मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या सर्व तारखा, वेळा मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी ठरवा. कायदा कोणी हाती घ्यायचा नाही. कोविडचे नियम पाळून आंदोलन करायचे आहे. माझी एक विनंती आहे की मी एकटंच आझाद मैदानला लाक्षणिक उपोषण करायला तयार आहे. तुम्ही आंदोलन कशाला करता? नका करू असेही संभाजीराजे म्हणाले.