पुणे: प्रवासात ५० टक्के सवलत मिळाल्यानंतर महिलांची गर्दी वाढली. एसटीबराेबरच पीएमपीमधून जाणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने स्वारगेट परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या महिलांना लक्ष्य करण्यासाठी वापरली जाणारी पद्धतही वेगळीच आहे. या महिला चक्क नेलकटरने महिलांच्या गळ्यातील सोन्याची छोटीशी चेन कट करत होत्या. त्यांची चोरी करण्याची मोडस पाहून पोलिसही चकित झाले.
दरम्यान, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना साध्या वेशात एसटी बसस्टँड, पीएमपी बसस्टँडवर पाळत ठेवण्यास सांगितले हाेते. तेव्हा त्यांना काळ्या रंगाचा स्कार्प व हिरव्या रंगाचा स्वेटर परिधान केलेल्या दोन महिला स्वारगेट येथील पीएमपी बसस्टॉपजवळ रेंगाळताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केल्यावर त्यांनी या ठिकाणावरून तब्बल ८ चोऱ्या केल्याची कबुली दिली.
करुणानिधी सिद्धराज जिनकेरी (वय २५), श्वेता उर्फ सरिता काशीनाथ पाटील (वय २४, दोघी रा. सोलापूर, मूळ तारफेल गुलबर्गा) अशी दोघींची नावे आहेत. या दोघींकडून ८ गुन्ह्यातील ६ लाख ६० हजार रुपयांचे ९ तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या दोघींनी गेल्या २ ते ३ महिन्यांमध्ये या चोऱ्या केल्या होत्या.सोलापूरहून त्या पुण्यात येत. स्वारगेट एसटी बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका पुरुषाची सोनसाखळी अशीच नेलकटरने तोडून चोरली होती. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे गर्दीचा गैरफायदा घेऊन चाेऱ्या करू लागल्या. तो चोरीचा मुद्देमाल त्यांनी गुलबर्गा येथील एका सराफाला विक्री केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आणखी इतर गुन्ह्यांचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी शिवा गायकवाड, फिरोज शेख, सुजय पवार, मुकुंद तारू, दीपक खेंदाड यांच्या पथकाने केली.
गर्दीतून जाताय लक्ष ठेवा
पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चालू बसमध्येच त्या चोरी करून उतरत असत. तर बसस्थानक परिसरात प्रवासी बसमध्ये चढताना दरवाज्याजवळ गर्दी करत. त्यानंतर सावज जाळ्यात आले की नेलकटरच्या साह्याने काही सेकंदात हातातील बांगडी, गळ्यातील सोनसाखळी चोरी करत होत्या. तेव्हा गर्दीतून जाताना काळजी घ्या.