पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले. तिच्याकडून २७० ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त केली. तपासात या महिलेने औषधांच्या कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी लपवल्याचे उघड झाले. नुकत्याच सुरू झालेल्या पुणे- बँकॉक या आंतरराष्ट्रीय विमानाने ही महिला पुण्यात आली होती.
कस्टमच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तस्करी करणारी महिला मूळची दिल्लीतील आहे. बँकॉक- पुणे स्पाइसजेटच्या विमानाने ही महिला लोहगावमधील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आली. घाईत निघालेल्या या महिलेला कस्टमच्या पथकाने पाहिले. संशय आल्याने अडवून चौकशी केली असता औषधी कॅप्सुल सापडल्या. सोन्याची पेस्ट करून कॅप्सुलमध्ये लपवल्याचे उघड झाले. कॅप्सुलमधून २७२ ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच पुणे- बँकॉक या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही विमानसेवा पुणेकरांना थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता यावा, यासाठी सुरू केली आहे. मात्र, काही लोकांनी या सेवेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.