पुणे : दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. मोहमद साफीर उमर सोबार (रा़ चिन्नई) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मोहमद हा 4 ऑगस्टला चेन्नईहून दुबईला गेला होता. 5 ऑगस्टला तो पुन्हा दुबईतून स्पाईस जेट या विमानाने पुण्यात आला. त्याने दोन्ही गुडघ्याला नीकॅप लावलेली होती, त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्यात चार पॅकेट आढळून आली. पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजर याच्या सहाय्याने त्याने गोल्ड पावडर तयार केली होती. तर दुसऱ्या एका घटनेत सीमा शुल्क विभागाने बेकायदेशीरपणे आणलेल्या 1 लाख 64 हजार 200 सिगारेटचे 821 बॉक्स जप्त केले आहेत. पुणे विमानतळावर 7 अफगाणी नागरिकांनी त्यांच्या बॅगेत परदेशी कंपनीच्या सिगारेट आणल्या होत्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन या सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली.