लोणी काळभोर : पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे दागिने चोरणा-या दोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मछिंद्र जाधव (वय २३, रा. शास्त्रीनगर, मावंडीनाका, बीड) व विशाल राजू तुपे (वय २२, रा. पानवल, ता. माण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे. श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवार (१० जुलै ) रोजी दुपारच्या विसाव्यासाठी ऊरूळी कांचन (ता. हवेली) येथे आला होता. सोहळ्याचे आगमन झाले, त्यावेळी ओंकार बाळासाहेब जगताप (वय २१, रा. आश्रम रोड, लाठी हॉस्पिटल शेजारी, ऊरूळी कांचन) हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शंभो महादेव डेअरी जवळ वारकरी व भाविकांना पाणी वाटण्याचे काम करत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीत त्यांना गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याचे जाणवले. तेव्हा ते मोठ्याने ओरडले. त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस हवालदार सागर कडू, अमोल भोसले, समीर चमनशेख यांनी दिपक जाधव याला जागीच पकडले. चोरी केलेली सोनसाखळी त्याने तोंडात लपवली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यानंतर मुक्कामासाठी यवत (ता. दौंड) कडे निघाला. तो पुणे - सोलापूर महामार्गावर दुपारी सव्वातीनच्या सुमारास हॉटेल सोनाई समोर आला. त्यावेळी तेथे निलिमा मनोज कांचन (वय ३२, रा. कृष्णछाया गार्डन सोसायटी, सदनिका क्रमांक १, डी विंग, डाळींब रोड, ऊरूळी कांचन) हे पतीसमवेत पादुकांचे दर्शन घेत असताना त्यांना गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून तोडल्याचे जाणवले. ते मागे असलेल्या व्यक्तीच्या हातात दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून पोलीस हवालदार घारे यांनी विशाल तुपे याला जागीच पकडले. त्यावेळी तुपे याने चोरलेले गंठण रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:36 PM
पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे दागिने चोरणा-या दोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले.
ठळक मुद्देदोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक लाखांचे दागिने हस्तगत