युगंधर ताजणे पिंपरी : कोरोनामुळे सर्वसामान्य व्यक्तींना जगणे अवघड होऊन बसले आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम हा विवाहांवर होत आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर अनेक वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. लग्नकार्यात सर्वात महत्वाची गोष्ट समजल्या जाणाऱ्या सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे जमत असलेली लग्ने तर काही ठिकाणी जमलेली लग्ने केवळ सोन्याच्या भावामुळे मोडीत निघाली आहेत. यात विशेषत: मुलाकडच्यांकडून सोने देणेघेण्याच्याबाबत वाढलेल्या अपेक्षा मुलीच्या आईवडिलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. चालुघडीला सोन्याचा दर ५१ हजारांच्या आसपास आहे. मागील काही दिवसांपूर्वी तो ५५ हजारांच्या पुढे होता. कोरोनाचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. ऐन लग्नसराईत कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे शहरातील सर्व सोन्याची दुकाने बंद होती. कडक लॉकडाऊनमुळे सर्वांनाच वेगळया परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आता ५० माणसांच्या उपस्थितीत लग्ने करण्याची परवानगी असून यामुळे लग्नात होणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चावर मर्यादा आल्या आहेत. परंतु सोन्याची खरेदी करण्याकडे अद्याप बहुतांशी व्यक्तींचा कल आहे. प्रामुख्याने लग्नकार्यात महत्वाचे स्थान असलेल्या सोन्याला लॉकडाऊननंतर भलताच भाव आला आहे. सोन्याचे वाढत जाणारे दर याची माहिती पालकांना असूनही मुलीकडच्यांकडे केली जाणाऱ्या मागणीमुळे नाते दुरावताना दिसत आहे. सध्याच्या स्थितीत लग्न करण्यासाठी हॉल बुकिंग, केटरर्स, सजावट, वाजंत्री, यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
..... सगळयांनाच सोने हवे आहे, द्यायचे कुठून ? सध्या परिस्थिती काय आहे, याचा विचार मुलाकडची माणसे करत नाहीत. अगोदरच लग्न काढून देण्याच्या खर्चामुळे मुलीच्या पालकांची दमछाक होते. निम्यापेक्षा जास्त खर्च मुलीचे पालक करतात. आपल्याकडे स्त्री पुरुष समानतेच्या केवळ गप्पा केल्या जातात. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. दोन्हीकडच्या पक्षांनी खर्च वाटून घेणे हा पर्याय खुल्या मनाने स्वीकारण्याऐवजी आपण मुलाकडचे आहोत हे दाखवायला मुलाचे पालक अतिउत्साही असतात. यामुळे एखादे चांगले स्थळ हातातून जाते हे त्यांच्या लक्षात येत नाही. लॉकडाऊननंतर सोने घेणे परवडणारे नाही. गरजेनुसार दागिने करुन पुढे दर कमी झाल्यानंतर ते पुन्हा करता येतील असे सांगूनही पालक ऐकत नाहीत. याला काय म्हणावे ? - एका मुलीचे त्रस्त पालक ..... मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत लग्ने करायची परवानगी प्रशासनाने दिली आहे. अशावेळी अनेकजण कमीत कमी खर्चात लग्नकार्य उरकून टाकत आहेत. अर्थात यात गैर काही नाही. कोरोनाचा संसर्ग आणि अव्वाच्या सव्वा खर्च टाळण्यासाठी या पर्यायांचा विचार व्हायला हवा. परंतु सोयरीक जमवताना मुलाकडच्यांकडून ‘देणे -घेणे’ यात सोन्याला अधिक भाव आहे. मुलगी शिकलेली, चांगली पगार असलेली, अशी अपेक्षा त्यांची असते. याशिवाय तिच्या घरच्यांकडून किमान ६ तर काहीजण १० तोळयांची मागणी करत आहे. उच्चविद्याविभुषित, मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करणारे तरुण जेव्हा अशाप्रकारची मागणी करतात तेव्हा त्यांची कीव येते. - वधुवर सुचक मंडळाचे एक कार्यकर्ते