खोडद : प्राचीन इतिहासाची पाने आणखी पाठीमागे उलगडत गेलो की आपल्याला बौद्ध संस्कृतीचा सुवर्णकाळ नजरेस पडेल. या सुवर्णकाळात आपण गेल्यानंतर प्राचीन शिल्पकला बघून मन अगदी हरखून जाते. येथील लेणींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जुन्नर तालुका किती वैभवशाली होता याची व्याप्ती लक्षात येते. प्राचीन बौद्ध संस्कृतीचा हा वारसा अधिक जपण्यासाठी व समाजासमोर आणण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लेणी अभ्यासक सुनील खरे यांनी केले.
इतिहासाला उजळणी देण्यासाठी आणि हे वैभव जपण्यासाठी एमबीसीपीआर टीमने शिवनेरी बुद्ध लेणींवर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जुन्नर, पुणे, नाशिक, कल्याण विविध ठिकाणांहून सुमारे ५० लेणी अभ्यासक उपस्थित होते. या वेळी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुनील खरे बोलत होते.
यावेळी सुनील खरे म्हणाले की, ‘भारतातील १२०० लेण्यांपैकी ९०० लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी ४२५ लेणी फक्त जुन्नर तालुक्यात आहेत.यावरून येथील वैभव सिद्ध होते. क्षत्रप व सातवाहन या राजांचा संघर्ष कमीतकमी १०० वर्षे सुरू होता. तरीही त्यांनी संघर्षाचा येथील लेण्यांच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. लेणी तयार करण्याचे काम व धम्मप्रसाराचे काम त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले."
रणरणत्या उन्हातून प्रवास करत लेणींवर पोचल्यावर खराटे घेऊन पूर्ण लेणी समूह व चैत्यगृह स्वच्छ केला नंतर पाण्याने सर्व चैत्यस्तूप धुऊन काढला. या वेळी कार्यशाळेसाठी आलेल्या लेणी अभ्यासकांनी अगदी तळमळीने साफसफाईचे काम केले. फुलांच्या माळांनी स्तुपाची सजावट करून दीप प्रज्वलित केले.
सामुदायिक बुद्धवंदना, त्रिसरण व पंचशील घेऊन कार्यशाळेची सुरुवात झाली. या वेळी पूर्ण स्तुपाची व कार्यशाळेची माहिती सुनील खरे, प्रभाकर जोगदंड यांनी दिली. शीलालेखाची माहिती संतोष वाघमारे यांनी दिली. गौतम कदम यांनी लेणी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. कविता खरे यांनी स्वागत करून आभार मानले.
या वेळी संतोष अंभोरे, सुधीर भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले.
मुंबईतली भटकंती टीमचे सदस्य देखील या कार्यशाळेस उपस्थित होते. या वेळी पुण्यातील प्रफुल्ल कांबळे, वैशाली कांबळे तसेच जुन्नरमधील अमरदीप कांबळे, आनंद खरात, पुण्यातील निखिल देशमुख तसेच महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन टीमचे भिकाजी सुरडकर, शशिकांत निकम, आशिष भोसले, दया लवांदे, महेश कांबळे, निर्मलकुमार, अरुण साळुंके व पुणे, मुंबई, नाशिक, कल्याण, रायगड येथील लेणी अभ्यासक उपस्थित होते.
--
२३ खोडद प्राचीन इति
कॅप्शन : जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवरील लेणीमध्ये आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना लेणी अभ्यासक सुनील खरे.