महाराष्ट्र शासन पर्यटन संचनालयाच्या सहाय्यक संचालिका सुप्रिया करमरकर यांनी जुन्नर तालुक्यातील बोरी गावातील सुमन अँग्रोटूरिझम व ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन बोरी गाव पर्यटन गाव म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने गेली १० वर्षे ग्रामस्थांनी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन मार्गदर्शन केले.
या वेळी सुप्रिया करमरकर म्हणाल्या की, ग्रामीण पर्यटन ही आपली संस्कृती असून ती टिकविण्याची जबाबदारी आपण कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पार पाडू शकतो.
या वेळी बोरी गावच्या सरपंच वैशाली जाधव, माजी सरपंच पुष्पाताई कोरडे, बोरी बुद्रूक पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष अमोल कोरडे, रंजन जाधव, बाळासाहेब जाधव, युवराज कोरडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्या पर्यटन विभागाच्या नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र २०१६ च्या धोरणाअंतर्गत विविध प्रोत्साहनपर योजनांचा लाभ घेता येणार आहे. प्रसिद्धी व मार्केटिंग पर्यटन विभागाकडून करण्यात येऊन अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे.
बोरी बुद्रूक गावाने मागील १० वर्षांत गाव ‘पर्यटन गाव’ म्हणून विकसित करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या योजना पर्यटन वाढीच्यासाठी राबविल्या असून त्यासाठी बोरी गावाच्या पर्यटन विकास आराखडादेखील तयार केला आहे. बोरी हे प्राचीन काळापासूनचे महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव आहे. बोरी गावात १४ लाख वर्षांपूर्वीची ज्वालामुखीय राख, २ मी. लांबीचा हत्तीचा प्रागैतेहासिक काळात हस्तिदंत सापडलेली व अजूनही अश्मयुगीन हत्यारे सापडणारी जागा, प्राचीन वाडे, मंदिरे अश्मयुगीन हत्यारे या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या गोष्टी आहेत. गावाने मागील काळात तालुक्यातील एकमेव निसर्ग पर्यटन केंद्र वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतले असून, आमदार बेनके व खासदार कोल्हे यांचे अंतर्गत त्याचे काम चालू झाले आहे. ग्रामपंचायत ने ‘बोरी बुद्रूक पर्यटन व वारसा संवर्धन समिती’ स्थापन केली असून, एमसीडीसी अंतर्गत स्थापित बोरी बुद्रूक ग्रामीण शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत पर्यटनवाढीसाठी विविध गोष्टी आयोजित केल्या जातात.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचनालयाच्या सहाय्यक संचालिका सुप्रिया करमरकर यांनी जुन्नर तालुक्यातील बोरी गावातील ग्रामस्थांनी केलेल्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.