पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५०हून अधिक आधार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला; मात्र युनिक आयडेंटिफिकेशन आॅफ इंडियाच्या (यूआयडीएआय) संकेतस्थळानुसार जिल्ह्यात २४७ आधार केंद्र सुरू आहेत.परिणामी, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत तब्बल ११५ आधार केंद्रांची तफावत आहे.जिल्ह्यात प्रथमत: ४० आधार केंद्रे सुरू झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाआॅनलाइन, यूआयडीएआयकडे पाठपुरावा करून आधार केंद्र वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच, आधार यंत्रे दुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळावेत आणि खासगी आधार यंत्रचालकांनी शासकीय इमारतींमध्ये आधारची कामे करण्याला परवानगी द्याावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीला होता.त्यास मान्यता मिळाल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्र पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. तसेच, देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने दिल्या. त्यानुसार बँका व पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ३५० हून अधिक केंद्र सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.-गेल्या आठवड्यात पुण्यातील बँकांमध्ये ६१, टपाल कार्यालयांमध्ये ४७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये ४५, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २०, तसेच पिंपरी-चिंचवडमधील बँकांमध्ये १४, टपाल कार्यालयांमध्ये १७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये १२, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ८, नागरी सुविधा केंद्रांमध्ये १८, तर ग्रामीण भागात १२० ठिकाणी, अशी ३६२ केंद्र सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती.-यूआयडीएआयच्या संकेतस्थळानुसार शहरात ७० आणि जिल्ह्यात ६०, बँका आणि पोस्ट कार्यालयांमध्ये ११७ अशा एकूण २४७ ठिकाणी आधार केंद्र सुरू आहेत. परिणामी, जिल्हा प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यात तब्बल ११५ आधार केंद्र कमी असल्याचेदिसून येत आहे.
आधार केंद्रांच्या संख्येबाबत गोलमालच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:40 AM