आंबेठाण : शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून कठडे बसविण्याची किती गरज आहे, हे जगासमोर आणले होते. या कामासाठी अखेर नागरिकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले आहे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणीवेचा आणि जनतेच्या एकीचा या ठिकाणी विजय झाला असून ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे.काही वर्षांपूर्वी दोन विद्यार्थी सायकलसह नदीपात्रात पडले होते. सुदैवाने त्या वेळी ते किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे कधी काय घटना घडेल? हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-गोनवडी ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांना ग्रामस्थांच्या बैठकीत बोलावले.लोकसहभागातून हे काम करण्याचा निश्चय केला. त्यांच्यासह पोपट मोहिते, सचिन काळे, तानाजी काळे, मोतीराम मोहिते, सुभाष मोहिते यांनी पुढाकार घेतला. शरद बुट्टेपाटील यांच्या पुढाकाराने खाजगी क्षेत्रातून १.५० लाख रुपये किमतीचे स्टील (लोखंड) मिळविण्यात आले. त्यासाठी पिंपरी बुद्रुकचे सरपंच विकास ठाकुर यांनी गावाकडून १० हजार रुपये तर गोनवडी-पिंपरी गावांकडून सरपंच शोभाताई भांगरे व उपसरपंच मीराताई काळे यांनी १० हजार रुपये खर्च केले. सुमंत विद्यालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी देखील या कामासाठी पैसा जमा केला.२५-३० वर्षे शासनाची वाट पाहून पाहून कंटाळून गेलेले लोक व विद्यार्थ्यांनी हे काम सहभागातून पूर्ण केले, ही मोठी कौतुकाची गोष्ट असून संपूर्ण तालुक्यासह अन्य भागांत त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे आणि त्यांचे हे काम समाजाला आदर्शवत ठरत आहे.(वार्ताहर)गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या खेड तालुक्यातीलदोन गावांच्या दरम्यान भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला लोखंडी कठडे बसविण्यासाठी जवळपास २.५ ते ३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. हा सर्व खर्च लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसा आणि वस्तूरूपी उभा केला गेला. एका बाजूला २५ फुट खोल खडकाळ दरी आणि दुसऱ्या बाजूला १५ ते २० फुट खोल पाणी अशा दुहेरी संकटांचा सामना करीत या बंधाऱ्यावरून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत असे.
गोनवडी बंधाऱ्याला बसविले कठडे
By admin | Published: January 23, 2016 2:31 AM