लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतामधील भाज्यांना परदेशातही चांगली पसंती मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून येत्या काही वर्षात उद्दिष्ट वाढवण्यावर भर दिला जात आहे.
भेंडी, मिरची, कारले, काकडी, गाजर, बीट, पालक, मेथी, सुरण, बटाटा या भाज्यांना जगातील ७० ते ८० देशांमध्ये चांगली मागणी आहे. देशाची या भाज्यांची निर्यात सध्या ३ ते ४ लाख मेट्रिक टन आहे. त्यातील ५० ते ५५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. राज्यातील साधारण अडीच हजार शेतकरी सध्या भाज्यांच्या निर्यातीत आहेत. नाशिक, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, भंडारा, ठाणे, अमरावती या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.
देशातील शेतीमाल निर्यातीसाठी एपेडा ही संस्था केंद्र सरकारने स्थापन केली आहे. त्यांच्या व्हेजनेट या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारचा कृषी विभाग व निर्यात कक्ष महाराष्ट्राची भाज्यांमधील निर्यात अधिक वाढावी यासाठी प्रयत्न करत आहे.
परदेशात पाठवण्यात येणाऱ्या भाज्यांचे निकष पाळणे महत्वाचे असते. त्यासाठी शेतक-यांनी भाज्यांची लागवड करण्याआधी व्हेजनेटवर त्यांच्या शेतीक्षेत्राची नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी झाली की व्हेजनेटच्या माध्यमातून संबधित शेतक-याला कोणती खते किती प्रमाणात वापरायची, बियाणे कोणते वापरायचे याची माहिती दिली जाते. निर्यातदार कंपनीची निवड, भाज्यांचे पॅकिंग, त्या कुठे पाठवायच्या, कशाने पाठवायच्या, त्यासाठीची प्रक्रिया या सर्व स्तरावर व्हेजनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते.
राज्यातील भाज्या सर्व निकषांवर पार पडत असल्याने आता निर्यातक्षम भाज्यांचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती राज्याच्या निर्यात कक्षाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली. कांद्याची निर्यातही राज्यातून जास्त प्रमाणात होते. देशातून १२ ते १३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. त्यातील निम्मा वाटा राज्याचा आहे.