राजू इनामदार-
पुणे: महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमुळे शहरातील नवोदित, होतकरू चित्रकारांना अच्छे दिन आले आहेत. संपुर्ण शहरातील भिंतींवर वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरू आहे. कुठे पुण्यातील ऐतिहासिक वास्तुंचे, तर कुठे जिल्ह्यातील धरणांचे तर कुठे नव्याजु्न्या इमारतींचे दर्शन पुणेकरांना शहरातील रस्त्यांच्या कडेंना असणाऱ्या संरक्षक भिंतींवर होत आहे...
लातूर, उस्मानाबाद अशा दुष्काळी भागातून पुण्यात येणाऱ्या व कसेबसे राहत, कोणतेही काम करणाऱ्या चित्रकारांना यातून चांगले काम मिळाले आहे. ज्ञानेश्वर दिलीपराव सोमुलवार हा गाव नळगीर, ता. उदगीर, जि. लातूर मधून काही वर्षांपुर्वी पुण्यात आला. अभिनव महाविद्यालयामधून त्याने जीडी आर्ट अभ्यासक्रम पुर्ण केला. आता विठ्ठलवाडीजवळ स्टुडिओ सुरू करून मिळेल ती कामे करत असतो. त्याला पु. ल. देशपांडे उद्यानाला लागून असलेले २०० फूट लांबीची व १० फूट उंचीची एक भिंत चित्र काढायला मिळाले. या भिंतीचे त्याने सोने केले आहे. संपुर्ण पुणे दर्शनच त्याने या भिंतीवर चितारले आहे. रितेश, सचिन, अंबादास हेही असेच परगावाहून पोट भरण्यासाठी म्हणून पुण्यात आलेले. त्यांचे तर चित्रकलेचे पारंपरिक शिक्षणही नाही झालेले, तरीही हातात असलेल्या कलेच्या बळावर ते पुण्यात आले व फिरत होते. त्यांच्याही हातांना आता हे भिंतींवर चित्र काढायचे काम मिळाले आहे. खडकवासला धरण, पर्वती, सारसबाग अशा निरनिराळ्या स्थळांची चित्र ते काढत असतात. बालभारती संस्थेची संरक्षक भिंत, धायरीतील उड्डाणपूल, अशा अनेक ठिकाणी सध्या ही चित्रकारी सुरू आहे.अॅपेक्स रंगाने ही चित्र रंगवली जातात. किमान चार ते पाच तास एक चित्र पुर्ण करायला लागतात. अॅपेक्सचे पावसातही खराब न होणारे रंग ते वापरतात. खडबडीत भिंतींवर चित्र काढायचे एक वेगळेच शास्त्र आहे. ते या कलाकारांनी अनुभवातून आत्मसात केले आहे. त्यामुळेच कागदावर चालतो तसाच ब्रश ते या भिंतींवरही अगदी सहज चालवतात. चित्र काढता येतात याचाच आनंदपैसे मिळतात हा आनंद आहेच, पण काम करायला मिळते हे त्यापेक्षा मोठे आहे. कोणताही चित्रकार पैशांसाठी म्हणून काम करत नाही. आम्हीही करत नाही, मात्र कामच मिळत नाही ही परिस्थिती त्याच्यासाठी फार वाईट असते. पुण्यात आता भिंतींवर का होईना चित्र काढायला मिळते आहे हे फार आनंदाचे आहे. आता तर हे आव्हानात्मक काम करायला जास्त मजा येत आहे.ज्ञानेश्वर उर्फ अवधूत सोमुलवार, चित्रकार