लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सलग सुटीनंतर मार्केट यार्डात फुलांची आवक चांगली झाली आहे. शेवंती, गुलछडी, मोगरा व इतर फुलांना चांगली मागणी आहे. जून, जुलै महिन्याच्या तुलनेत दरही वाढले आहेत. शेवंतीला साधरण किलोला ३०-४० रुपये दर मिळत आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने फुलांची मागणी वाढली आहे. मात्र, देवळांचे दरवाजे अजूनही बंद असल्याने मागणी नेहमीच्या श्रावणाइतकी नसल्याचे फुल व्यापारी सांगतात.
देवळं उघडली तर फुलांची मागणी वाढेल, दरातही वाढ होईल, असे फुलांचे व्यापारी सागर भाेसले यांनी सांगितले. पुणे, सातारा, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमधून फुलांची आवक पुण्याच्या बाजारात होते. श्रावणातील सणासुदीमुळे शेवंतीचे उत्पादन फुल उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. मात्र त्या तुलनेत फुलांची मागणी वाढलेली नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत नाही.
किलोचे दर पुढीलप्रमाणे : गुलछडी : १००-१५०, शेवंती : ३०-५०, मोगरा : २५०-३५०, ॲस्टर : २०-३०, जरबेरा : २०-४०.