पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी इच्छुकांकडून दिवसभर सोशल मीडियावरून विविध मेसेजेसचा मारा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मतदारांवर इच्छुकांकडून नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यंदा चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असल्याने प्रभागाचा विस्तार वाढणार असून, मतदार संख्याही वाढणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. अशातच प्रत्येक उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. परिचय पत्रकवाटप, फ्लेक्सबाजी यासह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळे नियोजन केले जात आहे. वेगवेगळ्या कारणांनी मतदारांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नववर्षाच्या शुभेच्छांचे संदेश दिले जात आहेत. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही इच्छुकांनी तर सोशल मीडियाच्या कामकाजासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. पहाटेपासूनच ‘शुभ प्रभात’च्या मेसेजला सुरुवात होत आहे. सध्या इच्छुकांकडून सोशल मीडियावरून प्रचार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. आकर्षक डिझाइनमध्ये मेसेज पाठविले जात आहेत. (प्रतिनिधी)- मोबाइलवरून सोशल मीडियामार्फत शुभेच्छा देण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रभागातील मतदारांचे मोबाइल क्रमांकही संकलित केले आहेत. शुभेच्छांसह इच्छुकांकडून राबविण्यात छोट्या-मोठ्या उपक्रमांचीही माहिती सोशल मीडियामार्फत दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यासह यापूर्वी केलेल्या कामांचेही फोटो व माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोशल मीडियावरून शुभेच्छांचा मारा
By admin | Published: January 01, 2017 4:36 AM