----------
पक्ष्यांविषयी शाळेत असताना लळा लागला आणि त्यातच करीअर करायचे शुभांगी भोर हिने ठरवले. पक्षी निरीक्षण करतानाच त्यांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्यासाठी अधिवास टिकवणे, त्यांची काळजी घेणे आदी कामे ती करत आहे. साऱ्या गावालाच पक्ष्यांच्या प्रेमात तिने पाडले आणि गाव पक्षी म्हणून चष्मेवाला पक्ष्याची निवड केली. लोकांमध्ये पक्षीप्रेम जागृत केले, अशी शुभांगी हिचे घुबडांवर खूप प्रेम असून, ते वाचविण्यासाठी ती कष्ट घेते आहे.
———————————
भोर तालुक्यातील पिसावरे तिचे गाव. स. प. महाविद्यालयातून प्राणिशास्त्रामध्ये बी.एस्सी. पदवी घेतली आणि आत्ता एम.एस्सी. (पर्यावरण) देसाई महाविद्यालयात करत आहे. ती गावात असताना तिच्या विद्यालयात दळवी सरांनी एक पक्षी निरीक्षण मंडळ तयार केले होते. इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी आणि रविवारी पक्षी पाहायला ते सर घेऊन जात असत. तेव्हापासून शुभांगीला पक्ष्यांचा लळा लागला.
शुभांगी म्हणाली, ‘‘पक्षीनिरीक्षण करत आजपर्यंत आमच्या परिसरात १८७ जातींची नोंद केली आहे.यात स्थलांतरित ३५ जाती आहेत. तसेच ७५ प्रकारची फुलपाखरे पाहायला मिळतात. शिकारी पक्षी, माळावरचे पक्षी ,पाणथळीचे पक्षी स्थलांतरित असे वर्गीकरण करून त्याची एक यादी म्हणजेच ( Check List) तयार केली. आणि आम्हाला आमचा मार्ग दिसायला लागला. पक्षी संवर्धन करणे गरजेचे आहे. परिसरात कोणाला जखमी पक्षी सापडला तर ते माझ्या घरी आणून देऊ लागले. त्यांना सांभाळत असताना डॉ. चौघुले (शिरवळ येथील सरकारी दवाखाना) यांची खूप मदत झाली. त्यांना काय द्यायचे (औषधे) हे समजायला लागले आणि माझे सर्व कुटुंबीय या पक्ष्यांची सेवा करू लागले.
घुबडाबाबत अनेक अंधश्रध्दा आहेत. शुभांगी त्याबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करते. नांदगावात एका घरात सात घुबडाची पिल्लं होती. ती पिल्लं शुभांगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी वाचवली. भोर परिसरात घुबडांचा अधिवास असल्याने अनेक ठिकाणी घुबड सापडतात. त्यांना वाचविण्यासाठी शुभांगी काम करतेय. तिला पक्षीतज्ज्ञ डॅा. सतीश पांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शुभांगी म्हणते,‘‘आम्ही नुसते पक्षी पाहून त्यांच्या नोंदी ठेवत नाही, तर त्यांच्याविषयी जागृतीपण निर्माण करतो. लोकांत अशी जागृती निर्माण व्हावी म्हणून आमचे विद्यालय व आम्ही गावपक्षी निवडणूक घेतली. या निवडणुकीचा निकाल डॉ. सतीश पांडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. चष्मेवाला ( इंडिअन व्हाईट आय) हा आमचा गावपक्षी ठरला. या नंतर आम्ही गाव फुलपाखरू, गाव वृक्ष इत्यादी निवडणुका घेतल्या. यातून लोकांना पर्यावरणाची जाणीव होत राहावी, हीच तळमळीची इच्छा आहे. कृत्रिम घरटी तयार करून ती लावणे लावायला देणे, उन्हाळ्यात पक्षांसाठी कृत्रिम तळी तयार करणे, गावचा ओढ साफ करणे ,अनेक शाळा किंवा महविद्यालये मुलांसाठी पक्षीनिरीक्षण सहली आयोजित केल्या जातात. अश्या वेळी गाईड म्हणून मोफत काम करणे, शाळा महाविद्यालयात माहिती देणे असे असंख्य उपक्रम चालू आहेत.’’