पुणे : देशात मान्सून अर्थात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, येत्या पाच दिवसांत तो केरळमध्ये धडक देईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये वर्दी देतो. मात्र, या सुधारित अंदाजनुसार तो एक दिवस आधीच अर्थात ३१ मे रोजीच धडकणार आहे. तसेच यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज असून, ईशान्य भारत वगळता देशाच्या अन्य भागात मान्सून सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रमेल या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होत असून, पुढील पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये धडक देईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या उत्तर भारतात सुरू असलेली उष्णतेची लाट पुढील तीन दिवसात काही प्रमाणात कमी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी (दि. २७) नैऋत्य मोसमी अर्थात मान्सूनचा जून-सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळासाठी दीर्घश्रेणीचा अंदाज व्यक्त केला असून, देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात मान्सूनच्या प्रारूपानुसार ४ टक्के फरक पडेल, अशी माहिती विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.
या अंदाजानुसार...
- मध्य भारत आणि दक्षिण भारतात १०६ टक्क्यांपेक्षा जास्त, वायव्य भारतात ९२ ते १०८ टक्के अर्थात सरासरी इतका आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी अर्थात ९४ टक्क्यांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. - मान्सूनचा कोअर झोन अर्थात मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त (१०६ टक्क्यांपेक्षा जास्त) असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
- जूनमध्ये देशभरात सामान्य पाऊस (९२ ते १०८ टक्के) पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील बहुतांश भागात आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात तसेच वायव्य आणि ईशान्य भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील उत्तर आणि पूर्व भाग आणि मध्य भारताचा पूर्व भाग आणि ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- जूनमध्ये, देशातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता असून, दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारतातील अनेक भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये मासिक किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर वायव्य भारतातील उत्तरेकडील भाग आणि पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता किमान तापमान सरासरी इतके राहील.
- तर उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
- या वर्षाच्या सुरुवातीला विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात एल निनो स्थिती वेगाने मजबूत होत असून, एल निनो स्थिती कमकुवत झाली आहे. ला निना परिस्थिती पावसाळ्याच्या उत्तरार्धात पूर्ण विकसित होण्याची शक्यता आहे.
- हिंदी महासागरावर सध्या तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थिती कार्यरत आहे. अनेक जागतिक हवामान मॉडेल्सच्या ताज्या अंदाजानुसार मान्सूनच्या काळात सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.