लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवामान विभागाने यंदा माॅन्सून सर्वसाधारण ९७ ते १०४ टक्के पडणार असल्याची सुखद वार्ता नुकतीच दिल्यानंतर आता दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमनेही दक्षिण आशियात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दक्षिण आशियात माॅन्सून दरम्यान पावसाची स्थिती कशी असेल, याचा आढावा ९ आशियाई देशांतील तज्ज्ञ घेत असतात. त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे. यंदा ही परिषद २६ ते २८ एप्रिलदरम्यान ऑनलाईन झाली. या परिषदेत तज्ज्ञांनी यंदा दक्षिण आशियात सर्वसाधारण पाऊसमान असेल, असा अंदाज व्यक्त केला.
पश्चिम भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्व, पूर्व भाग मध्य भारतातील अनेक भागांत यंदा पाऊस सर्वाधिक असेल. वायव्य, ईशान्य भागातील बऱ्याच भागांत सामान्यांपेक्षा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या हंगामात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील पश्चिम, वायव्य, उत्तर आणि उत्तर पूर्वेकडील भागामध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा कमी असेल. या काळात ला निनो हा तटस्थ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे.