पुणे : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या नाट्यगृहांचा पडदा उद्यापासून ( ५ नोव्हेंबर) ५० टक्के क्षमतेने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाने मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी दिल्याने नाट्यवर्तुळातून जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे..आता महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाट्यगृहांची साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून ही संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यानंतर नाट्यक्षेत्राकडून व्यवसायाचे पुनश्च हरीओम केले जाणार आहे.
शासनाने टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करून विविध क्षेत्र खुली केल्यानंतर आठ महिन्यांपासून ठप्प असलेला नाट्य व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीने नाट्यवर्तुळात जोर धरला होता. याकरिता मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने एक समिती स्थापन करून नाटयगृह उघडल्यानंतर कोणती काळजी घेण्यात येईल याबाबतची एक नियमावली सादर केली होती..त्यानुसार १ नोव्हेंम्बरला नाट्यगृह खुली होतील अशी अपेक्षा होती. परंतु ' देर आए दुरूस्त आए' प्रमाणे शासनाने उद्या ( ५ नोव्हेंबर) मराठी रंगभूमी दिन साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला ही खूशखबर दिल्याने नाट्य क्षेत्रातील विविध मंडळींनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ........मुख्यमंत्र्यांचे आम्ही अभिनंदन करतो. आठ महिने महाराष्ट्रातील सगळी नाट्यगृहे आणि चित्रपटगृह बंद होती. आता ती सुरू होत असल्याचा आनंद आहे. या नाट्य आणि चित्रपट व्यवसायावर असंख्य कलाकारांचे आयुष्य अवलंबून आहे. त्यांनी आठ महिने कठीण परिस्थितीत घालवले आणि पडद्यामागील कलाकारांचे अतोनात हाल झाले. 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी निर्णयामुळे आम्हाला नाट्य व्यवसायाचे पुनश्च हरिओम करिता येईल.सर्व अटी आणि नियम आम्ही कामाला सुरूवात करू- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरुड नाट्य परिषद........ नाट्यगृहे सुरू होत असल्याचा आनंद आहे. पण, मूळ मुद्दा आहे तो नाट्यगृहांच्या दुरुस्तीचा आणि साफसफाईचा. एकदा त्याबाबद्दल प्रेक्षकांचा विश्वास निर्माण झाला की, आम्हालाही चांगल्या पद्धतीने कामाला उभारी मिळेल. या निर्णयाचे आम्ही नक्कीच स्वागत करतो. मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आमच्यासाठीगोड बातमी आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट आम्ही पाहणार आहोत- मोहन कुलकर्णी आणि समीर हंपी,नाट्य व्यवस्थापक.... नाट्यगृह सुरू होणार असल्याने नाट्य कलावंतांना दिलासा मिळाला आहे. नाट्य व्यवसायाला यातून नक्कीच गती मिळेल. यावर अवलंबून असलेली असंख्य कलाकार असून, त्यांना काम मिळेल. नाट्य क्षेत्र पूर्ववत व्हायला वेळ लागेल. पण, आता नाट्यगृह सुरू होणार असल्यामुळे नाट्य क्षेत्राला सुरुवात होत असल्याचा आनंद आहे- शरद पोंक्षे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद..... सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर आता महापालिकेने नाट्यगृहांची दुरुस्ती आणि साफसफाईवर काही दिवसांमध्ये भर द्यावा. मराठी रंगभूमी दिनानिमित्त उद्या ( ५ नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे जमून, नाट्यगृहांचे तारखा वाटप आठवड्याभरात सुरू करू. पालिका प्रशासनाने नाट्यगृह सुरू करताना प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मेघराज राजेभोसले, अध्यक्ष नाट्य परिषद पुणे शाखा....... आम्ही वारंवार नाट्यगृहे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत होतो. आम्ही काही संस्थांनी एकत्र येऊन एसओपीची एक प्रत सरकारला दिली होती. पण, काहीच झाले नाही. आम्ही नाट्यगृहे सुरू करण्यासाठी आंदोलनही करणार होतो. मात्र, आता नाट्यगृहे सुरू होणार असल्याचा आनंद आहे. लवकरच घटक संस्थांची बैठक घेऊन आम्ही पत्रकार परिषद घेऊन नाट्य प्रयोग केव्हा सुरू करायचे याचा निर्णय घेऊ.
- राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ........