प्रज्ञा केळकर-सिंग - पुणे : दुबईहून आलेल्या पुण्यातील पती-पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तेथूनच महाराष्ट्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. एकाच कुटुंबातील पहिले तीन कोरोनाबाधित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल होऊन रविवारी (२२ मार्च) १४ दिवस पूर्ण झाले. सोमवारी या तिघांची कोरोनाची चाचणी होणार आहे. ‘उद्या आमची पहिली चाचणी आणि २४ तासांनी दुसरी चाचणी होईल. त्यानंतर घरी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. आता घरी जाण्याचे वेध लागले आहेत’, अशी भावना कोरोनाबाधित रुग्णाने व्यक्त केली. होळीच्या दिवशी (९ मार्च) राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यापाठोपाठ रुग्णाची पत्नी आणि मुलगीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने पुण्यावरील कोरोनाचे सावट आणखी गडद झाले. तसेच, त्यांनी मुंबईतून पुण्याला येण्यासाठी केलेल्या कॅबचा चालकही बाधित आढळून आला. त्यानंतर त्यांच्या सोबत दुबईहून आलेल्या आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा वाढत गेल्याने संपूर्ण राज्यासह देशातील सर्व यंत्रणा ‘अलर्ट’ झाल्या. नायडू रुग्णालयाला एक प्रकारे छावणीचे स्वरूप आले. सुरुवातीला रुग्णालयात एक वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला. मात्र, रुग्णांची संख्या वाढत गेल्याने नवीन इमारतीतील विलगीकरण कक्षात रुग्णांना दाखल करण्यात आले. आता पहिल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांना नायडूमध्ये दाखल करुन रविवारी १४ दिवस पूर्ण झाले. कोरोना विषाणूची बाधा होण्याचा कालावधी २ ते १४ दिवस एवढा आहे. हा कालावधी पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रोटोकॉलनुसार, सोमवारी तिघांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतर संबंधितांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.‘रविवारी आम्हाला नायडूमध्ये दाखल होऊन १४ दिवस पूर्ण झाले. सुरुवातीचे दोन दिवस आम्ही प्रचंड घाबरलो होतो. हळूहळू परिस्थितीची कल्पना येत गेली. डॉक्टर, नर्स सर्वजण सहकार्य करत आहेत. चहा, नाश्ता, जेवण खोलीबाहेरील टेबलवर ठेवले जाते. खोलीची दिवसातून एकदा व्यवस्थित स्वच्छता केली जाते. दिवसातून २ वेळा डॉक्टर, तर दोनदा अस्टिटंट डॉक्टर तपासणीसाठी येतात. मी, पत्नी आणि मुलगी तिघांना गेल्या आठ दिवसांत खोकला, शिंक, ताप असा काहीच त्रास झालेला नाही. मानसिकदृष्टया कितीही खंबीर राहायचा प्रयत्न केला तरी आता एकटेपणा असह्य झाला आहे. कधी एकदा घरी जाता येईल, असे वाटत आहे.’...........मी, पत्नी आणि मुलगी तिसºया मजल्यावर एका खोलीमध्ये आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून मुलाला पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये ‘क्वारंटाईन’ करण्यात आले. गेल्या १४ दिवसांत त्याची एकदाही भेट झालेली नाही. तो एकटा असल्याने खूप कंटाळला असेल. त्याची सुरुवातीची चाचणी निगेटिव्ह आली. रविवारी पुन्हा त्याची चाचणी केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो आमच्या एक दिवस आधी घरी गेला तर घराची स्वच्छता करून घेऊ शकेल. घरी गेल्यानंतरही आम्हाला काही दिवस तरी बाहेर जाता येणार नाही आणि तशी काळजीही आम्ही घेणार आहोत.’
शुभवार्ता : १४ दिवसांच्या संघर्षानंतर पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधिताला आता घरी जाण्याचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:05 PM
होळीच्या दिवशी राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देरविवारी १४ दिवस पूर्ण : आज होणार तपासणी, लक्षणे नाहीत