पुणे: कोरोनाच्या गडद संकटाच्या काळात नाट्यगृह आणि चित्रपटगृहे बंद असल्याने पडद्यमागच्या कलाकारांच्या कामावर गदा आली आहे. मागच्या वर्षीपासून त्यांना काम मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बॅकस्टेज कनेक्ट नावाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. प्रकाशयोजनाकार तेजस देवधर यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.
रंगमंचावरील कलाकाराला ऑनलाइनच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पडद्यासमोरील कलाकार सद्यस्थितीत सर्व मनोरंजनीय गोष्टी बंद असल्या तरी ते ऑनलाइनद्वारे आपले सादरीकरण करता येत आहे. मात्र पडद्यामागच्या कलाकारांना असे काही पर्याय उपलब्ध नाहीत. म्हणूनच या संकेतस्थळाच्या मदतीने ते कामे मिळवू शकतात. असे देवधर यांनी सांगितले आहे.
बॅकस्टेज कनेक्ट नावाची वेबसाईट लवकरच सुरू होणार आहे. त्यावर कामे देणारे आणि कामे मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे दोन्ही प्रकारचे कलाकार नोंदणी करू शकणार आहेत. कलाकार लिंकडीन प्रमाणे स्वतःचे वर्क प्रोफाइल तयार करू शकतो. त्याने केलेल्या कामाचे फोटो, लिंक सर्व वेबसाईटवर शेअर करता येणार आहे. त्यामुळे दोघांनाही या वेबसाईटचा फायदा होणार आहे. नाटक आणि चित्रपट यांच्याशी संबंधित सर्व प्रकारची कामे मिळण्यास कलाकारांना मदत होईल.
देवधर म्हणाले, कोरोनामुळे सर्व काही बंद झाले आहे. आता वेळ मिळाल्याने कलाकार घरी बसून संकेतस्थळावर कामे शोधू शकतात. सर्व काही सुरळीत झाल्यावर या गोष्टीचा कलाकारांना नक्कीच फायदा होणार आहे. पडद्यामागच्या कलाकारांना काम मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही हे पाऊल उचलले आहे. श्रीरंग खापर्डे आणि भाग्येश रानडे यांचे या कामामध्ये सहकार्य लाभत आहे. संकेतस्थळ सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त कलाकारांनी नोंदणी करावी. असे आवाहन देवधर यांनी केले आहे.