लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी (दि. ७) केंद्र सरकारकडे अर्ज केला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यास लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनिकातर्फे संशोधित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरु आहे. सध्या सिरममध्ये दर महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार होत आहेत. जानेवारीपासून १० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. लस उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती.
“आपत्कालीन परिस्थितीत ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या वापरासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार आहे,” असे आदर पुनावाला यांनी मोदी यांच्या पुणे भेटीनंतर स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असल्याची माहिती त्यांनी व्टिट करुन दिली. यापूर्वी फायझर या अमेरिकेतील कंपनीने दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीत लसीच्या वापराला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
‘‘सर्वांना दिलेल्या वचनानुसार, २०२० हे वर्ष संपण्यापूर्वी सिरमने ‘मेड इन इंडिया’ ‘कोव्हिशिल्ड’ या पहिल्यावहिल्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत. आम्हाला मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो’’, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
कोरोनावरील लस वितरणासाठी सिरमकडून भारतालाच प्राधान्य दिले जाणार आहे. जुलै २०२१ पर्यंत केंद्र सरकारला ३० ते ४० कोटी डोस पुरवण्याचे लक्ष्य सिरम इन्स्टिट्यूटसमोर आहे. त्यादृष्टीने उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.