पुणे : मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने २६ धरणांपैकी २१ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे, सोलापूर तसेच अहमदनगर व उस्मानाबादच्या काही भागासाठी उपयुक्त असलेले उजनी (९६.०४) धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे, आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जवळपास महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, मागील दोन आठवड्यापासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: मुठा खोरे (खडकवासला प्रकल्प), नीरा खोरे शंभर भरले आहे. तर कुकडी प्रकल्पातील धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.
पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात (मुठा खोरे) १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ पैकी २१ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याचबरोबर निरा खोऱ्यात देखील १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर नाझरे धरणांत २५.७२ टक्के पाणी जमा झाले आहे.