पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जीओ आणि एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार असून यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे.
भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे. राज्यात विमानतळावर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच ५ जी प्लस सेवा आहे. कंपनीकडून गुरुवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे, पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या हवाई प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. लोहगावच्या संपूर्ण विमानतळ कार्यक्षेत्रात ही सेवा कार्यरत असणार आहे. ५ जी स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांना हायस्पीड डेटा वापरुन या सेवाचा लाभ घेता येईल. त्यासाठी, ग्राहकांना सीम कार्ड बदलण्याची गरज नाही. ग्राहकांचे ४ जी सीमच ५ जीसाठी इनेबल असणार आहे.
दरम्यान, एअरटेलने यापूर्वी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानीपत, आणि गुरुग्राम विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
5G चा वेग किती असेल?
मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.
२०२४ पर्यंत देशात सर्वत्र ५ जी
१ ऑक्टोबर २०२२ पासून भारतात एअरटेल 5जी लाँच होत आहे. भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. कंपनीने आठ शहरांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्याची योजना असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.