पुणेकरांसाठी गुडन्यूज... अजित पवारांच्या प्रवासानंतर मेट्रोच्या वेळेत झाला बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:43 AM2023-08-14T09:43:06+5:302023-08-14T09:44:21+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात.
पुणे - येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, अजित पवारांनी मेट्रोतील प्रवाशांना मेट्रो सोयीची पडते का, तिकीट दर किती आहे, यांसह अनेक सवाल केले. तसेच, मेट्रोच्या वेळेसंदर्भातही विचारणा केली होती. आता, अजित पवारांच्या सूचनेनुसार वेळेत बदल करण्यात आला आहे.
पुण्यातील आमदार महेश लांडगे यांनी मेट्रोच्या वेळेत झालेल्या बदलाची माहिती दिली. खुशखबरी ! प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. १७ ऑगस्टपासून पुणे मेट्रो सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे स्टेशन येथून मुंबईला जाणारी सकाळची ७:१५ वाजताची डेक्कन क्वीन पकडणे शक्य होईल. तसेच, मागणी आल्यास मेट्रोची सध्याची रात्रीची कमाल वेळ १० ऐवजी ११ करण्यात येईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यामुळे, आता पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. तसेच, पुण्याहून मुंबईसाठी दैनिक प्रवास करणाऱ्या किंवा इतर प्रवाशांनाही या वेळेतील बदलाचा अधिक फायदा होईल. दरम्यान, यापूर्वी सकाळी ७ वाजता मेट्रो सुरू होत होती, ती रात्री १० वाजेपर्यंत चालवण्यात येत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन यासंदर्भाने अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवासादरम्यान दिले होते.
विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूकांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी म्हटले होते.