- अंबादास गवंडीपुणे :पुणेरेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास रेल्वे बोर्डाकडून गेल्या वर्षी मंजुरी आहे. सध्या काम सुरू झाले असून, डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरील भार आणखी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे विभागात पुणे विभाग महत्त्वाचा विभाग आहे. या ठिकाणावरून दररोज दीड लाखापेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. शिवाय येथून दिवसाला २०० रेल्वे गाड्या ये-जा करतात. भविष्यात आणखी गाड्या वाढण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील वाढता ताण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हडपसर व खडकी येथे दोन टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला होता. त्यापैकी हडपसर रेल्वे टर्मिनलला मंजुरी मिळून त्याचे कामदेखील सुरू आहे. त्या ठिकाणीही एक एक्स्प्रेस गाडीदेखील सुरू करण्यात आली आहे. तिथे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, डिसेंबर २०२५ पर्यंत खडकी टर्मिनलचे काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
३७ कोटी रुपये मंजूर
रेल्वे बोर्डाने मार्च २०२४ महिन्यात खडकी टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यासाठी बोर्डाकडून ३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार खडकी येथे नव्याने एक प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच, दोन स्टेबलिंग लाइन विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रवाशांच्या सोईच्या दृष्टिकोनातून विविध कामे केली जाणार आहेत. खडकी टर्मिनल विकसित केल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यादेखील येथून सोडणे शक्य होणार आहे. तसेच, काही लोकलदेखील येथून सोडता येतील. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
हे होतील नवीन कामे
- नव्याने एक प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे.
-प्लॅटफॉर्म क्रमांक एकचे रुंदीकरण करून उंची वाढविली जाणार आहे.
-प्लॅटफॉर्म यार्ड लाइन चारची दुरुस्ती व रुंदीकरण.
-पादचारी पुलाचा विस्तार.
खडकी येथे टर्मिनलचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. -हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी