पुणे : इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) एक-दोन सामन्यांसाठीही गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या पुण्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. २७ वर्षांनंतर पुण्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तब्बल पाच सामने रंगणार आहेत. पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील याआधीचा शेवटचा सामना २० फेब्रुवारी १९९६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध केनिया यांच्यात नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांना यंदा जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे.
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाले आहेत. यात मुख्य आकर्षण १९ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे असेल.
१९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत २९ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज वि. केनिया हा सामना पुण्यातील नेहरू स्टेडियमवर खेळला गेला होता. केनियाने या सामन्यात वेस्ट इंडिजचा ७३ धावांनी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला होता.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे सांगितले. भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांशिवाय इतर चार सामने पुण्यात होतील.
"महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआय यांचे आभार मानतो. अन्य राज्य संघटनादेखील या सामन्यांच्या आयोजनासाठी प्रयत्न करत होत्या. परंतु, बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखवला." असे रोहित पवार म्हणाले.
पवार यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, खजिनदार आशिष शेलार, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले.
पुण्यात होणारे सामने :
१९ ऑक्टोबर : भारत वि. बांगलादेश
३० ऑक्टोबर : अफगाणिस्तान वि क्वालिफायर २
१ नोव्हेंबर : न्यूझीलँड वि. दक्षिण आफ्रिका
८ नोव्हेंबर : इंग्लंड वि. क्वालिफायर १
१२ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश.
वरील चार सामने दुपारी २ वाजता सुरू होतील. ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सामना सकाळी १०:३० ला सुरू होईल.
विश्वचषक स्पर्धेचे २७ वर्षांनी पुण्यात आयोजन होणार आहे. भारतीय संघाचे सामने आयोजित करणे ही नेहमीच आनंदाची बाब असते आणि विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन ही तेवढीच आनंददायी आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संधी आम्हाला मिळाली, हा आम्ही आमचा सन्मानच मानतो.
- रोहित पवार, महाराष्ट्र क्रिकेट संघटना