पुणे : आठवड्यातून दोन वेळा धावणारी नांदेड-हडपसररेल्वे आता दररोज नांदेड ते पुणे धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ही गाडी ५ जुलैपासून दररोज धावणार आहे. या गाडीच्या नंबरमध्येही बदल केले असून, नवीन नंबर १७६३० आणि १७६२९ आहे.
नांदेडसह मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालयातर्फे हा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून पुण्याला येण्यासाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरणार आहे. या रेल्वेला १३ डबे असणार आहेत. यात वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे चार डबे, पाच स्लीपर आणि दोन जनरल श्रेणीतील डबे असतील, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.
रेल्वेचा मार्ग आणि वेळ
- नांदेड-पुणे एक्स्प्रेस (१७६३०) : ही रेल्वे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी सव्वातीन वाजता सुटेल. पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
- पुुणे-नांदेड एक्स्प्रेस (१७६२९) : ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वादहा वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचेल.