पुणे : गेले काही दिवस कर्नाटकातच रखडलेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. आज अखेर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे राज्याची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे.
मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती अनुकूल झाली असून मध्य विषवृत्तीय प्रवाह हळूहळू गतिमान होत आहे. तसेच अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला असून मान्सूनची वाटचाल उत्तरेकडे सुरू झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली.
दक्षिण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त येत्या दोन दिवसांत मान्सून कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण आंध्रप्रदेशचा काही भाग तर बंगालचा उपसागरात पोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह घाट परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज असून त्यानंतरच्या दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही हीच स्थिती असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.