पुणे : नैऋत्य मॉन्सून एक दिवसापूर्वी मुक्कामी होता, पण आता तो शुक्रवारपासून (दि.२४) सक्रिय झाला असून, आज शनिवारी बराच पुढे सरकला आहे. बंगालच्या उपसागरामधील काही भागांमध्ये त्याने प्रवेश केला आहे. पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, २४ तासांमध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या मॉन्सूनची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे वेळेअगोदर तो काही भागांमध्ये पोहचू शकतो. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये ‘रेमेल’ चक्रीवादळाचे सावट आहे. त्यामुळे प. बंगालच्या किनारपट्टीवर त्याचा फटका बसणार आहे, त्या ठिकाणच्या भागामध्ये हवामान खात्याने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
पुढील बारा तासांमध्ये पं. बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सध्या पं. बंगाल आणि बांग्लादेशच्या काही भागात २६ मेपर्यंत वादळाचा फटका सहन करावा लागणार आहे. प. बंगाल, ओडिसा, अंदमान-निकोबार बेट या भागांमध्ये या वादळाचा धोका निर्माण झालेला आहे.