आनंदाची बातमी! मान्सूनचा प्रवास वेगाने; आज सकाळीच लावली पुण्यात हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:20 PM2021-06-06T15:20:00+5:302021-06-06T15:20:06+5:30
प्रथमच पुण्यासह अलिबागपर्यंत मॉन्सूनचे आगमन
पुणे: शनिवारीच महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या मॉन्सून एक्सप्रेसने आपला प्रवास असाच वेगवान ठेवत आज पुण्यात प्रवेश केला आहे. मॉन्सूनने अलिबाग, पुणे, मेडक, नलगौंडा, श्रीहरी कोटा येथपर्यंत मजल मारली असल्याचे जाहीर केले. उस्मानाबाद जिल्ह्यात मॉन्सूनने प्रवेश केला आहे.
पुणे शहरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोलापूर, सातारापर्यंत मजल मारलेल्या मॉन्सूनने पुण्यातही प्रवेश केला असल्यासारखे वातावरण शनिवारी रात्री होते. त्याप्रमाणे हवामान विभागाने मॉन्सूनने पुण्यात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, रविवारी सकाळपासून लख्ख ऊन पडले असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात यापूर्वी ८ जूनला मॉन्सून येत असल्याचे मानले जात असे. मात्र, गेल्या ३० वर्षाच्या प्रत्यक्ष आगमनावरुन पुण्यात मॉन्सूनचे आगमन १० जून रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यामानाने यंदा मॉन्सूनचे पुण्यात लवकर आगमन झाले आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४.५ मिमी, पाषाण येथे १०.१ मिमी आणि लोहगाव येथे ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरातील दुसर्या शाखेने आज जोरदार मुसंडी मारत ईशान्य भारतातील बहुतांश भागात प्रवेश केला. नागालँड, मणिपूर, मेझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मॉन्सूनने प्रवेश केला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.