पुणे: पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गरजूंसाठी ओसवाल बंधू समाज संस्थेकडून फक्त दहा रुपयांमध्ये भोजन थाळी असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मार्केट यार्डातील दि पूना मर्चंट्स चेंबरने या उपक्रमास साह्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोफत शिवभोजन थाळी चालू केली. तसेच रिक्षावाले आणि गरजूना धान्य आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले. यालाच प्रतिसाद देत या भोजन थाळीला सुरुवात करण्यात आली आहे. या थाळीत मसाले भात, पुरी, भाजी, मिष्टान्नाचा समावेश असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू, कष्टकरी वर्गाचे कडक निर्बंधात हाल होऊ नयेत या विचाराने उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ओसवाल बंधू समाजाचे उपाध्यक्ष प्रकाश पारख, सचिव जवाहरलाल बोथरा, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा आदींनी उपक्रमाला सुरुवात केली आहे.