पुणे : रायगड, महाबळेश्वर, लोणावळा दर्शन या विशेष बससेवांपाठोपाठ आता एसटी महामंडळ पुणे विभाग प्रवाशांना रामोजी फिल्मसिटीची सफर घडविणार आहे. त्यासाठी एसटीची लक्झरी बस प्रवाशांचे सेवेत असेल. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दोन रात्रीच्या मुक्कामासह फिल्मसिटी पाहता येणार आहे.
एसटी महामंडळाकडून घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या कालावधीत जादा बससेवेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर पुणे विभागाने महाबळेश्वर, रायगड, लोणावळा, कोकण, अष्टविनायक, गाणगापुर दर्शन या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे एसटीकडून पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणांसाठी विशेष सेवा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. पुण्यातून अनेक जण सुट्टयांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी फिल्मसिटीमध्ये जातात. याअनुषंगाने एसटीने पुण्यात रामोजी फिल्मसिटी दर्शन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी माहिती देताना पुणे विभागाचे वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, लवकरच रामोजी फिल्मसिटी सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबत फिल्मसिटीच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. बसचे तिकीट दर, प्रवास मार्ग, तेथील राहण्याची व्यवस्था आदीचे नियोजन केले जात आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरातच ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.-------अकरा मारुती दर्शनअष्टविनायक दर्शन या बससेवेप्रमाणे आता अकरा मारूती दर्शन बससेवाही सुरू होणार आहे. प्रत्येक शनिवारी ही बस धावेल. या सेवेचे तिकीट दर, बसची वेळ, प्रवासाचा मार्ग ही माहिती लवकरच प्रवाशांना दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.