पुणे : सुटीच्या दिवशी मार्गावर कमी बस येत असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ला कमी उत्पन्न मिळते. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवारी विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे. मागील महिन्यापासून सुरू करण्यात आलेला ‘बस डे’ हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, तिकीट चेकरच्या संख्येत वाढ, अधिकाधिक बस मार्गावर आणण्याची धडपड, अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता, जाहिरातबाजी अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने महिन्यात २ ते ३ शनिवार सुट्या वाढल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या मासिक उत्पन्नात आणखी घट होणार आहे. सुटीच्या दिवशी प्रतिसाद कमी मिळत असल्याने मार्गावरील बसची संख्या कमी केली जाते. या बस आगारामध्ये उभ्या असतात. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आगारामध्ये उभ्या असलेल्या विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी विशेष दर आकारले जाणार आहेत. सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते १० अशी दोन सत्र करण्यात आली आहे. एका सत्रासाठी प्रतिदिन आठ हजार रुपये दर आकारला जाईल. तर, संपूर्ण १२ तासांसाठी बस हवी असल्यास एकूण १६ हजार रुपये दर आकारण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या नव्याने दाखल झालेल्या १२ मीटर लांबीच्या ‘सीएनजी’ बस आहेत. प्रामुख्याने या बससेवेसाठी उपलब्ध असतील. तसेच भविष्यात वातानुकूलित ई-बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.-----------बस बुकिंगसाठी - बस बुक करण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत वाहतूक व्यवस्थापक विभागात चौकशी करता येईल. बसचे पैसे डीडीद्वारे किंवा रोखीने भरता येतील. बुकिंगसाठी ०२०- २४५०३३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.--------------
पुणेकरांसाठी खूशखबर! पीएमपीची शनिवार, रविवारी विशेष सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 6:44 PM
विना वातानुकूलित बस नागरिकांना खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार
ठळक मुद्देराज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने महिन्यात २ ते ३ शनिवार सुट्या वाढल्या सकाळी ६ ते २ आणि दुपारी २ ते १० अशी दोन सत्र पीएमपीच्या ताफ्यात सध्या नव्याने दाखल झालेल्या १२ मीटर लांबीच्या ‘सीएनजी’ बस