पुणे : पुण्यातील निर्बंधात सूट देत असताना सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढत होती. काही दिवसातच सण, उत्सव सुरु होत असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. प्रवाशांची गैरसोय न होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने पीएमपी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारपासून सुमारे ११०० बस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धावतील. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे पीएमपीची सध्या मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू आहे. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे चार लाख २५ हजारांहून अधिक प्रवासी पीएमपीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे दररोज ७० ते ७५ लाख रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहेत. उपनगरे आणि जिल्ह्यांतील बसच्या वाहतुकीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करावा
‘‘सध्या ९५० ते १००० बस दोन्ही शहरांत धावत आहेत. परंतु, प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता बस वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ११०० बस बुधवारपासून वाढविण्यात येतील. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून प्रवाशांना प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी केले आहे.''