पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून क्लाऊड प्रिटिंग साेल्युशन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या माेबाईल किंवा लॅपटाॅपच्या सहाय्याने प्रिंटआऊट घेऊ शकणार आहेत. उद्या 4 डिसेंबर राेजी या सेवेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत हाेणार आहे. या सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना 24 तास घेता येणार आहे.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या जवळ ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या माेबाईल किंवा लॅपटाॅपवरील फाेटाे- फाईल यांच्या प्रती घेऊ शकणार आहेत. ही सुविधा चाेवीस तास उपलब्ध असणार असून तुलनेने स्वस्त असणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डब्लू.ई.पी. सोल्यूशन्स प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनीष गर्ग उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठ मुद्रणालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय कुटे यांनी दिली.