पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्राेची ट्रायल रन लवकरच हाेणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात पिंपरीतील संत तुकारामनगर स्थानक आणि फुगेवाडी स्थानक तयार हाेण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत पुणेकरांना मेट्राेतून प्रवास करण्याची संधी देखील मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात मेट्राेचे काम सुरु आहे. वनाझ ते रामवाडी तसेच पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असे मेट्राेचे दाेन मार्ग आहे. या मार्गांवर सध्या काम प्रगतीपथावर आहे. गेल्या आठवड्यात पुणे मेट्राेचे दाेन काेच नागपूरहून पुण्यात दाखल झाले आहेत. हे दाेन्ही काेच मेट्राेच्या रुळांवर देखील ठेवण्यात आले आहेत. लवकरच या मेट्राेची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. तसेच पिंपरीतील संत तुकारामनगर स्थानक आणि फुगेवाडी स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून फेब्रुवारी मध्ये या दाेन्ही स्थानकांचे काम पूर्ण हाेणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्राेचे काही स्थानक हे भुयारी असणार आहेत. शिवाजीनगर मधील शेतकी महाविद्यालयातून भुयारी मेट्राे सुरु हाेणार असून स्वारगेटपर्यंत ती भुयारी असणार आहे.
मेट्राेसाठी खाेदण्यात येणाऱ्या बाेगद्यांचे काम देखील सुरु झाले आहे. दाेन मशीन्सच्या सहाय्याने सध्या हे काम सुरु आहे. आत्तापर्यंत 200 मीटरच्या बाेगद्याचे काम देखील मेट्राेकडून पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षअखेरपर्यंत पुणेकरांची मेट्राेतून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण हाेण्याची शक्यता आहे.