पुणे :गेले काही दिवस सतत भीतीच्या छायेत वावरणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून मागील ४८ तासांपासून एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. अर्थात कोरोना विरोधातला लढा संपला नसला तरी एक सकारात्मक ऊर्जा मात्र यातून मिळणार असल्याचे मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत.यापैकी या दांपत्याला घरी सोडण्यात आले आहे.
या संदर्भात मोहोळ म्हणाले की , ' जगभर कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात चोवीस तासांत ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत . कोरोनाचे संकट मोठे असले तरी त्यावर मात करता येत आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असून योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे. कोरोनामुक्त होता येत असले तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यकच आहे'.