पुणे: मुठा खो-यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले असून, या धरणातून सोमवारी (दि.१६) रोजी ८ वाजल्यापासून नदीत २ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या लोकांना सुरक्षितेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या टेमघर, वरसगांव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणी साठ्यात गेल्या काही दिवसांत चांगली वढ झाली आहे. यामुळे सध्या या चारही धरणांमध्ये पुणे शहराला वर्षभर पुरेल ऐवढा पाणीसाठा जमा झाला आहे. या चारही धरणांमध्ये रविवारअखेर १६.२९ टीएमसी म्हणजे ५५.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. यात खडकवासला धरणात एकूण १.८० टीएमसी, वरसगाव ५.३७ टीएमसी, टेमघर १.६० टीएमसी आणि पानशेत धरणात ७.५२ टीएमसी पाणी साठा झाला आहे. यामध्ये मुठा खो-यात पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला प्रकल्पात तब्बल २ हजार क्युसेक्सने पाण्याचा येवा सुरु आहे.
सध्या धरण ९१ टक्के भरले असून, रात्री धरणात येणा-या पाण्याचा पूर नियंत्रण करण्यासाठी कॅनोलमधून ४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. परंतु पाण्याचे प्रमाण वाढत असल्याने सोमवारी सकाळी ८ वाजता नदीत देखील २ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.